लघु सामायिक पाठ (जेणे मनाला स्थिरता रहाते)
नमोस्तु सिद्धास ऋषीगणांस । त्रिकाल जे वंद्य तिन्ही जगास ॥
जेणे मनाला स्थिरता रहाते । करीन सामायिक शांतचित्ते ॥ १ ॥
संपूर्ण जीवांवर साम्यभाव । धरीन वा संयम शांतभाव ॥
मी आर्त रौद्र प्रकृती त्यजीन । त्रिकाल सामायिक आचरीन ॥ २ ॥
सर्वांवरी मी समता धरीन । कुणावरी वैर न मी करीन ॥
आशा महपाश झनी त्यजीन । होईन मी नित्य समाधिलीन ॥ ३ ॥
जे जीव रागादि विकारभावे । मी हाय रे! दुखविले असावे ॥
ते सर्व माझ्यावरती क्षमोत । क्षमीन मी त्यांसहि एकचित्त ॥ ४ ॥
मनोवच:कायकृतानुमोदे । रत्नत्रयीं दोष घडे प्रमादे ॥
ते दोष मी आज मुखे वदून । निंदा नि गर्हा करुनि त्यजीन ॥ ५ ॥
तिर्यंच वा मानव, देव यांची । पीडा जहाली तरि ही मनाची ॥
एकाग्रता निश्चल मी धरीन । कषाय, आहार, तनू त्यजीन ॥ ६ ॥
अनेक रागादि विकार भाव । प्रहर्ष, औत्सुक्य, भय प्रभाव ॥
दीनत्व मात्सर्य, विकार किंवा । सोडून देतों अरती रती वा ॥ ७ ॥
मृत्यू जरा, जन्म सदा जगात । यांची कधी भीति नसो मनात ॥
मी लाभ हानी सुख दुःख यांस । समान लेखीन विषामृतास ॥ ८ ॥
दृगज्ञान-चारित्र्य-तप:स्वरूप । आत्मा तथा संवर योगरूप ॥
आनंदरूपात्मक निर्विकल्प । आत्मा असे हा परमात्मरूप ॥ ९ ॥
आत्मा सदा शाश्वत एकरूप । याहून तें शेष अनेकरूप ॥
वियोग संयोग विभावरूप । जीवास नाना करिती विकल्प ॥ १० ॥
संयोगसंबंध असे जीवाला । म्हणून दुःखे असती तयाला ॥
संयोगसंबंध म्हणून आतां । सोडून देतो समतेकरितां ॥ ११ ॥
एवंच सामायिक हें अखंड । चालू असो यांत असो ना खंड ॥
मुक्ती-वधूला वशचूर्ण होवो । हे नित्य सामायिक शांति देवो ॥ १२ ॥
इष्ट प्रार्थना:
शास्त्राभ्यास जिनेंद्र-संस्तव सदा आर्यांसवे संगती । साधूंचे गुण-गान दोषकथनीं अत्यंत मुकस्थिती ॥
सर्वांशी हित मिष्ट भाषण असो आत्म्यामधे भावना । जन्मोजन्मी असे निरंतर घडो जों मुक्तीची साधना ॥ १३ ॥
॥ ॐ श्री वीतरागाय नमः ॥