जैन धर्म व तत्त्वज्ञानातील महत्त्वाच्या संकल्पना
- केवळ काया (शरीर/कृती) किंवा वचनानेच (बोलण्याने) नव्हे, तर मनानेसुद्धा कोणाचेही वाईट न चिंतणे म्हणजे अहिंसा.
- सूक्ष्मजीवांपासून ते मानवापर्यंत सर्व प्राण्यांमध्ये एकच आत्मा असतो, त्यामुळे प्रत्येकाच्या जगण्याच्या हक्काचा आदर केला पाहिजे.
- अनेकांतवाद: सत्य एकाच दृष्टिकोनातून पूर्ण समजत नाही. या सिद्धांतानुसार, सत्य आणि वास्तव हे गुंतागुंतीचे व अनेक पैलू असलेले असतात आणि कोणताही एक दृष्टिकोन पूर्णपणे परिपूर्ण नसतो. उदा. अंध आणि हत्तीची गोष्ट).
- स्याद्वाद: आपण मांडलेले मत हे पूर्ण सत्य नसून 'एका विशिष्ट दृष्टिकोनातून' सत्य असते. हा सिद्धांत विचारांमधील कट्टरता संपवून इतर विचारांचा आदर करायला शिकवतो.
- नैतिक दृष्टिकोनातून, 'अपरिग्रह' (अनासक्ती) या व्रताचे पालन करताना साधूंना सर्व मालमत्तेचा त्याग करावा लागतो, तसेच सामान्य अनुयायांनाही त्यांच्याकडील वस्तूंचा संग्रह आणि इच्छांवर मर्यादा घालण्यास ('इच्छा-परिमाण') प्रोत्साहित केले जाते.
द्रव्य म्हणजे ज्याचे अस्तित्व कधीही संपत नाही आणि ज्यात सतत पर्याय (बदल) घडत राहतात.जैन तत्त्वमीमांसा विश्वाचे स्वरूप आणि त्याचा आत्म्याशी (जीव) असलेला परस्परसंबंध स्पष्ट करते. यानुसार, आत्मा हे एक शाश्वत अस्तित्व आहे जे शरीर आणि भौतिक जगापासून वेगळे आहे. त्यांच्यातील याच परस्परसंबंधामुळे पुनर्जन्माचे चक्र (संसार) निश्चित होते.
"सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्गः"
अर्थात, सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान आणि सम्यक् चरित्र या तिन्हींचा एकत्रित (युगपत्) स्वीकार म्हणजेच मोक्षाचा मार्ग होय. हे तीन मार्ग वेगळे नसून एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत.
विभाग
श्रावकाचार
जैन धर्मात 'श्रावक' म्हणजे गृहस्थ (संसारिक जीवन जगणारा) अनुयायी. जैन श्रावक आचार म्हणजे गृहस्थांनी संसारिक जीवनात राहून अहिंसा, सत्य आणि संयम यांचे पालन कसे करावे, याची आचारसंहिता होय. हे प्रामुख्याने अष्ट मूलगुण, बारा व्रते, सहा आवश्यक आणि ११ प्रतिमा कर्तव्यांवर आधारित आहे.
मोक्षमार्ग
'मोक्ष मार्ग' ही जीवनाचा अंतिम आणि सर्वोच्च उद्देश गाठण्याची एक अत्यंत पवित्र व शास्त्रीय प्रक्रिया मानली जाते. सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान आणि सम्यक् चारित्र हे तिन्ही एकत्रितपणे मोक्षाचा मार्ग आहेत.
द्रव्य
जैन धर्मात द्रव्य (सत्/अस्तित्व) या मूलभूत संकल्पनेचा सखोल विचार आगम ग्रंथांमध्ये केला आहे. ज्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे, ज्याला स्वतःचे गुण आहेत आणि ज्याच्या अवस्था बदलतात, त्याला 'द्रव्य' म्हणतात. संपूर्ण जग हे ६ द्रव्यांनी बनलेले आहे : जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल.
कर्म
जैन तत्वज्ञातील कर्म हे एक मूलभूत तत्व आहे. मानवी नैतिक कर्मे ही आत्म्याच्या (जीवाच्या) पुनर्जन्माचा आधार बनतात. आत्मा पुनर्जन्माच्या चक्रात अडकलेला असतो आणि नश्वर जगात (संसार) अडकलेला असतो, जोपर्यंत त्याला अखेरीस मुक्ती (मोक्ष) मिळत नाही. शुद्धीकरणाच्या मार्गाचे अनुसरण करून मुक्ती प्राप्त होते.
प्ररुपणा (जीवस्थान प्ररुपणा)
'प्ररूपणा' म्हणजे एखाद्या विषयाचे किंवा सिद्धांताचे सखोल विश्लेषण आणि तार्किक युक्तिवाद. विशेषतः जैन सिद्धान्त ग्रंथांमध्ये (विशेषतः षट्खंडागम आणि गोम्मटसार - जीवकांड मध्ये), संसारी जीवांचे शोधन करणे, त्यांचा शोध घेणे आणि त्यांचे वर्गीकरण करून विविध दृष्टिकोनांतून (नयांच्या आधारे) विश्लेषण करणे तसेच आत्म्याच्या (जीवाच्या) अवस्था आणि वैशिष्ट्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेला प्ररूपणा म्हटले जाते.
अनेकांतवाद व स्यादवाद
जैन तत्त्वज्ञानाने संपूर्ण जगाला दिलेली सर्वात मोठी आणि क्रांतिकारी भेट म्हणजे 'अनेकांतवाद' आणि 'स्याद्वाद'. हे दोन सिद्धांत म्हणजे केवळ धार्मिक विचार नसून, ते सत्याचा शोध घेण्याचे आणि वैचारिक सहिष्णुता जपण्याचे एक उच्च दर्जाचे तत्त्वज्ञान आहे.